सगळ्यांनीच वाचव असं हे पत्र आहे. पुलंचे एक प्रेरणादायी पत्र पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केले होते. ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर.
१० जुलै १९५७, -
प्रिय चंदू
रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.
तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.
तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.
तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे! तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची –विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.
हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable?
माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.
कळावे,
भाई
No comments:
Post a Comment